गुरुवार, २६ मे, २०११

बाधा जडली आभाळाला - इंदिरा संत

बाधा जडली आभाळाला.
घुमू लागले
घुमवित घुमवित लाख घागरी;
बघू लागले वाकुन वाकुन
गवतावरच्या थेंबामध्ये;
फरफटलेही
उलटेसुलटे जळलहरींच्या मागुन;
टिपू लागले
ओठ लावुनी मातीचे कण.

आवरु बघते त्याला
दोन करांनी बांधुन,
आवरु बघते त्याला
डोळ्यांमध्ये कोंडुन.

व्यर्थच ते पण...
जाते निसटून
काजळावरी गढूळ ठेवुन छाया,
मुठीत ठेवुन फक्त निळी धग.

बुधवार, १८ मे, २०११

तात्पर्य - मंगेश पाडगांवकर

द्यायचं नाही असं जरी ठरवलंस,
तरी तू घ्यायचं नाहीस
असा त्याचा अर्थ होतो म्हणून कुणी सांगितलं ?

अदृश्य हात दान देणार्‍या देवाचा
झाडाला न कळत आतून आतून रसवतो
आणि मग फांद्यांची फुलं होतात.

सांगायचं तात्पर्य इतकंच की,
तू आधी नकळत फुलून घे :
द्यायचं - घ्यायचं काय ते आपण नंतर पाहू.

बुधवार, ११ मे, २०११

किलबिललेले उजाडताना - विंदा करंदीकर

किलबिललेले उजाडताना
ओठ उगवतीचा थरथरला
गुलाबलेला ओललालसर

तुंडुंबलेले
संथ निळेपण
पसरत गेले चार दिशांना
तांबुसवेडे

हळुहळु मग नि:स्तब्धातुन
स्वप्ने उडाली गुलाल घेऊन
लालचुटकश्या चोचीमध्ये
पिंजर-पंखी,
आणिक नंतर
’आप’ खुशीने अभ्र वितळले
उरले केशर
आणि भराभर
उधळण झाली आकाशावर
आकारांची
रंगदंगल्या.

नाहि उमगले
केव्हा सरला रजतराग हा
ही अस्ताई,
आणि उमटला रौप्यतराणा
झगमगणा-या जलद लयीतील
... असा विसरलो, विसावलो अन
नीरवतेच्या गुप्त समेवर
आणिक नंतर
न कळे कैसी
मनात माझ्या - काहि न करता-
जाणिव भरली कृतार्थतेची

सोमवार, ९ मे, २०११

ओढ - संजीवनी बोकील

दाराशी पोरकं
गोजिरं बाळ
रडत असावं
तसं अनौरस सुख
अनेकदा येतं आयुष्यात...
उचलावं तर
ते आपलं नसल्याचं भय
अन
पाठ फिरवावी तर
त्याच्या मोहमुठीत
अडकलेला पदर...

गुरुवार, ५ मे, २०११

पूर्णविराम ! - इंदिरा संत

अर्ध-स्वल्प-विरामांचे
रेंगाळणे जीव घेत;
उद्गाराची तशी कांडी
उगा जीव भुलवीत !

प्रश्नचिन्हाचा हा हूक
गळा घालतो संकट;
अर्धस्फुट रेषेमाजी
वादळाची घुसमट !

वाटे तुला शिकवावे
आता एक-एक चिन्ह :
अर्ध्याअपु-या वाक्याशी
पूर्णविरामाची खूण !