मंगळवार, २९ डिसेंबर, २००९

पर्गती? - ग. दि. माडगुळकर

धानू शिरपती,
कुठं कशाची झाली रं पर्गती?
गाडी बी तीच
गडी बी तेच
बैल बी तेच
कासरा त्योच
सैल
मग बदललं ते काय?
बैलाचं पाय?
उजव्या अंगाचा भादा बैल,
डाव्या अंगाला आला
पर,
त्यानं बदल रं काय झाला?
आता बसणाराना वाटतंय
जत्रा माघारी निघाली
माझा म्हननं
ही मजलच अवघड हाय
हे वझं जीवापरीस जड हाय
गाडी बी नवी बांधाय हुवी
रस्ता बी नवा कराय होवा
ताजीतवानी खोंडं जुपली
'त' कुणाला ठावं
जाईल गाडी सरळ
पण हे कुणी करायचं?
कसं करायचं?
पयला गाडीवान म्हनायचा
जल्दी जल्दी
आताचा बी म्हनतोय
जल्दी जल्दी
वाट बदलत न्हाई
बैल हालत नाही
धानू शिरपती,
ही कसली गा क्रांती?

बाहुल्या घेता का बाहुल्या? - ग. दि. माडगुळकर

बाहुल्या घेता का बाहुल्या?
या लाकडाच्या नव्हेत,
कापडाच्या नव्हेत
या आहेत वैष्णवी मेणाच्या
संतापाने मंतरलेल्या
बाहुल्या घेता का बाहुल्या?

या जवळ ठेवा,
हवा बदलून जाईल,
भ्रष्टाकार नावाचा ब्रम्हराक्षस
आसपास फिरकणार नाही.
लाचाई,
जाचाई,
टंचाई,
महागाई,
या साऱ्या क्षुद्र देवता
दिसतील दूर पळालेल्या
बाहुल्या घेता का बाहुल्या?

यांना नुसते बघितले तरी
बगळ्या भगतांची
हागणी बंद होऊन जातील,
या दृष्टी पडल्या तर
हुकुमशहा कोलमडतील
त्यांचे हुजरेच त्यांची धिंड काढतील.
या बाहुल्या नव्या नाहीत
जुन्याच आहेत
या राजघाटावरच सापडल्या
बाहुल्या घेता का बाहुल्या?

या बाहुल्या
तरण्या पोरांच्या उशागती ठेवा
सूर्याने डोळा उघडावा
तसा जागा होईल तो
गुजरात, बिहार या प्रांतांत
या हजारांनी विकल्या गेल्या
बाहुल्या घेता का बाहुल्या?

शुक्रवार, १८ डिसेंबर, २००९

रे हिंदबांधवा - भा.रा.तांबे

रे हिंदबांधवा, थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी,
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशिवाली ll ध्रृ ll

तांबेकुलवीरश्री ती,
नेवाळकरांची कीर्ति,
हिंदभूध्वजा जणु जळती,
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली ll १ ll

घोडयावर खंद्या स्वार,
हातात नंगि तलवार,
खणखणा करित ती वार,
गोऱ्यांची कोंडी फोडित, पाडित वीर इथे आली ll २ ll

कडकडा कडाडे बिजली,
शत्रुंची लष्करे थिजली,
मग कीर्तिरूप ती उरली,
ती हिंदभूमीच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली ll ३ ll

मिळतील इथे शाहीर,
लववितील माना वीर,
तरु, झरे ढाळीतील नीर,
ह्या दगडां फुटतील जिभा कथाया कथा सकळ काळी! ll ४ ll

बुधवार, १६ डिसेंबर, २००९

दवांत आलीस भल्या पहाटे - बा सी मर्ढेकर

दवांत आलीस भल्या पहाटी
शुक्राच्या तोऱ्यात एकदा,
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
तरल पावलांमधली शोभा

अडलिस आणिक पुढे जराशी
पुढे जराशी हसलिस; - मागे
वळुनि पाहणे विसरलीस का?
विसरलीस का हिरवे धागे?

लक्ष्य कुठे अन कुठे पिपासा,
सुंदरतेचा कसा इशारा;
डोळ्यांमधल्या डाळिंबांचा
सांग धरावा कैसा पारा!

अनोळख्याने ओळख कैशी
गतजन्मीची द्यावी सांग;
कोमल ओल्या आठवणींची
एथल्याच जर बुजली रांग!

तळहाताच्या नाजुक रेषा
कुणि वाचाव्या, कुणी पुसाव्या;
तांबुस निर्मल नखांवरी अन
शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या!

दवांत आलिस भल्या पहाटी
अभ्राच्या शोभेत एकदा;
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
मंद पावलांमधल्या गंधा.

सोमवार, १४ डिसेंबर, २००९

देवा, ह्याही देशात पाऊस पाड - दि. पु. चित्रे

(दिलीप पुरुषोत्तम चित्रे ह्यांना आदरांजली)


देवा, ह्याही देशात पाऊस पाड

जिथे पाण्याला येतो खुनाचा वास

जिथे हिंसेच्या मळ्यात पिकतो ऊस किंवा ताग

देवा, जिथे तू आहेस तोवर निषिद्ध आहे वैताग

देवा, ह्याही देशात पाऊस पाड

जिथे माणसांचं ख़त घालून समाज उगवतात

जिथे बळी जाणारे तुझ्यावर विश्वास ठेवतात

आणि बळी घेणारे तुझेच अवतार असतात

देवा, ह्याही देशात पाऊस पाड

जिथे दुष्काळही नशिबं फळवून जातात

जिथे माणुसकीची यंत्र अखंड चालू असतात

जिथे परोपकाराचा ओव्हरटाईम सदैव चालतो

देवा, ह्याही देशात पाऊस पाड

कारण इथे भरपूर खाणारे गाणी गातात

आणि ऊपाशी मरणारे त्यांना साथ करतात

जिथे दुश्काळ आणि सुकाळ एकत्र नांदतात

देवा, ह्याही देशात पाऊस पाड


रविवार, ६ डिसेंबर, २००९

रात्रही का वैऱ्याचीच, घालशील गा जन्माला! - बा.सी.मर्ढेकर

ओठांवर आली पूजा, भरे मनांत कापरें
ओल्या पापांची वाळून, झालीं वातड खापरें
पापांतून पापाकडे , जाई पाप्याचा विचार
आणि पुण्याचीं किरणें, लोळतात भुईवर
माथीं घेतलें गा ऊन, कटींखांदीं काळेंबेरें
तुझ्या आवडीचा क्षण, डोळ्यांतून मागे फिरे
गढूळला तोही क्षण, मतलबाच्या मातीने
कैसें पोसावे त्यांवर, आर्द्र स्वप्नांना स्वातीने
घडय़ाळांत आता फक्त, एक मिनिट बाराला
रात्रही का वैऱ्याचीच, घालशील गा जन्माला!

बुधवार, २ डिसेंबर, २००९

अनंता तुला कोण पाहु शके - बा.भ.बोरकर

अनंता तुला कोण पाहु शके
तुला गातसा वेद झाले मुके
मतीमंद अंधा कसा तू दिसे
तुझी रूप तृष्णा मनाला असे

तुझा ठाव कोठे कळेना जरी
गमे मानसा चातुरी माधुरी
तरू वल्लरींना भुकी मी पुसे
तुम्हा निर्मिता देव कोठे वसे

फुले सृष्टीची मानसा रंजिती
घरी सोयरी गुंगविती मती
सुखे भिन्नही येथे प्राणी चुके
कुठे चिन्मया ऐक्य लाभू शके

तुझे विश्व ब्रम्हांडही निःस्तुला
कृति गावया रे कळेना मला
भुकी बालका माय देवा चुके
तया पाजुनी कोण तोषु शके

नवी भावपुष्पे तुला वाहिली
तशी अर्पिली भक्ती बाष्पांजली
तुझ्या पद्मपत्रावरी ती स्थिरो
प्र्भू कल्पना जल्पना त्या हरो

मंगळवार, १ डिसेंबर, २००९

जशि धोब्याची मऊ इस्तरी - बा.सी.मर्ढेकर

(कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने)

जशि धोब्याची मऊ इस्तरी
तलम फिरावी सुतावरूनी
फाल्गुनातली चन्द्रकोर तशि
मलिन मनाच्या धाग्यांवरुनी

शिणेल धोबी यदाकदाचित,
पडेल खाली चन्द्रकोर अन्
सुरकुतलेल्या मनोवृत्तिंना
पुनश्च कोठे भट्टी भगवन्