शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०११

माझ्या खिशातला मोर - प्रशांत असनारे

माझ्याजवळ,
माझ्या खिशात
नेहमी एक मोर असतो
पण माझ्या खिशातला हा मोर
साधासुधा मोर नाही.

कधीमधी उदासलं
किंवा मनावर काळे ढग दाटून आले
की हा शिकवलेला मोर
खिशातून आपोआप बाहेर येतो,
देहभर पिसारा फुलवतो अन नाचतो..
मनसोक्त...मनमुराद.

त्याला नाचताना पाहून
मुसळधार पाऊस पडतो,
उदास काळे ढग निघून जातात
अन माझं मन
पुन्हा शुभ्र होतं...निरभ्र होतं

एक गंमत सांगू?
असाच एक मनकवडा मोर
तुमच्याही खिशात आहे:
फक्त तुम्ही,
त्याला नाचणं शिकवायला हवं !

गुरुवार, ११ ऑगस्ट, २०११

नाना पातळ्या मनाच्या - म. म. देशपांडे.

नाना पातळ्या मनाच्या
आणि चढायला जिने
वर वर जावे तसे
हाती येताता खजिने

नाना पातळ्यांवरुन
नाना जागांची दर्शने
उंचीवरुन बघता
दिसे अमर्याद जिणे

उंच पातळीवरुन
दिसताता स्पष्ट वाटा
वर जावे तसा होतो
आपोआप नम्र माथा

नाना पातळ्यांवरती
नाना लढतो मी रणे
होता विजयी; बांधितो
दारावरती तोरणे

बुधवार, १० ऑगस्ट, २०११

सांगाती - अनिल

हाती हात धरुन माझा
चालवणारा कोण तू?
जेथे जातो तेथे माझा
काय म्हणून सांगाती?
आवडतोस तू मला
की नावडतोस?
माझे मला कळत नाही !
एवढे मात्र जाणवते की
माझा हात धरुन असे चालवलेले
मला मुळीच खपत नाही !
स्वच्छंदाला माझ्या त्याचा करकोचा पडतो ना !
झिडकारुन तुझा हात
म्हणून दूर पळत जातो
बागडतो, अडखळतो, धडपडतो
केवळ तू कनवाळू पाठीशी उभा म्हणून
माझे दु:ख जाणवून
उगाच किंचाळत सुटतो
एरव्ही तू नसतांना
पडलो अन लागले तर
पुन्हा उठून हुंदडतो !

खांद्यावर हात माझ्या सदोदित
असा ठेवू नकोस ना
अशानेच माझी वाढ खुंटत जाते
असे मला वाटते ना !
बरोबरीचे वागणे हे खरोखरीचे आहे का?
खूप खूप माझी उंची एकाकीच
माझी मलाच वाढवू दे
तुझ्याहून नसली तरी तुझ्यासमान होऊ दे
तोवर असे दुरदुरुन, तुझा हात दूर करुन
मान उंच उभारुन
तुझ्याकडे धिटकारुन पाहू दे !

सोमवार, ८ ऑगस्ट, २०११

लाडकी बाहुली - शांता शेळके

लाडकी बाहुली होती माझी एक

मिळणार तशी न शोधूनी दुसऱ्या लाख
किती गोरी गोरी गाल गुलाबच फुलले
हासती केसही सुंदर काळे कुरळे
अंगात शोभला झगा रेशमी लाल
केसांवर फुलले लाल फितीचे फूल
कितीतरी बाहुल्या होत्या माझ्या जवळी
पण तीच सोनुली फार मला आवडती
मी तिजसह गेले माळावर खेळाया
मी लपुनी म्हटले साई-सूट्यो या या
किती शोध-शोधली परी न कोठे दिसली
परतले घरी मी होऊन हिरमुसलेली
वाटते सारखे जावे त्याच  ठिकाणी
शोधूनी पहावी पुन्हा पुन्हा ती चिमणी
जाणार कशी पण पाऊस संततधार
खल मुळी न तिजला वर झोंबे फार
पाऊस उघडता गेले माळावरती
गवतावर ओल्या मजला सापडली ती
कुणी गेली होती गाय तुडवूनी तिजला
पाहुनी  दशा ती रडूच आले मजला
मैत्रिणी म्हणाल्या काय अहा हे ध्यान
केसांच्या झिपऱ्या रंगही गेला उडून
पण आवडली ती तशीच मजला राणी
लाडकी बाहुली माझी माझी म्हणुनी

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०११

सनेही - एक कवितावली - वासंती मुझुमदार

पावसानं आपणहून यावं
असं खरं तर काय केलंय आपण?
काही करु शकतो का तरी?
आपण आपले त्याच्या येण्याचे साक्षी...
याहून काहीच नाही हाती.

पण एखाददिवशी
अगदी एकटक पाहत राहिल्यावर
आपोआप
उघडतं क्षितिज
आणि भोवतालच्या वृक्षांच्या
फांद्या
जळधारांच्याच असतात कितीकदा...

...

अगणित पाऊसकाळांतून
न्हाऊन आलेय
आजवर.

आत्ता कुठं कळतंय :
आपल्या हातात काहीच नसतं.
बरसण्याचं...

...

प्रत्येक पावसाळ्यात
तुझे
वेगवेगळे ’परफ्यूम्स’.

मला आपलं वाटायचं :
सतत तोच सुगंध येईल
तुझ्या हातांना
तुला मी चाफे दिले ना,
तेव्हाचा.

...

बोलावलंस
म्हणून आले.

तुझ्या
फुलांनी बहरलेल्या शहरा
लाल केशरी गेंदांची
सगळ्याभर फाल्गुनी.
ना डोळे निवायला उसंत...

इतक्या दिवसांनंतर
इथं आलास
तेव्हा माझ्या नगरात
नुसताच शिरवाच शिरवा...

माझे डोळे निवलेले.
तुझे मात्र विझलेले.

...

सगळं ओझं
उतरवून ठेवता येतं
तुझ्या दाराआत
सुरक्षित;
आणि
पूर्ण पाऊसकाळ होता येतं
मनभर...

तुझ्या स्निग्धतेनं
भरुन येतं मन
पुन्हा पुन्हा;
आणि
उतरवून ठेवलं जे जे
त्याला ना,
जागा उरेनाशी होते.
पावसानं
माती खोलपर्यंत ओली झाल्यावर
सुगंधाचं झाड फुटतं बघ
तीतून.
तसा तू परिमळत राहतोस
माझ्या असण्याभोवतालून...

...

"...माझं म्हणावं
असं तुझं
काय आहे माझ्यात?"
असं कोडं
नाही घालायचं पुन्हा.
किती वेळा उत्तर सांगू?
पाऊस...
पाऊस...
पाऊस...