गुरुवार, २८ एप्रिल, २०११

एक सवय - इंदिरा संत

इसापनीतीतील ’इ’ गिरवायला घेतली
तेव्हापासून जडलेली, अजूनही नसुटलेली
ही सवय
तात्पर्य काढण्याची. तात्पर्य
आलेल्या कडूगोड अनुभवांचे.
सुखदु:खाच्या प्रसंगांचे.
चालण्याचे. बोलण्याचे. वागण्याचे.
आपले. दुसऱ्याचे. सर्वांचे.
तात्पर्य.

वाटले होते या तात्पर्यांच्या दणकट
खुंट्या रोवून सहज सहज चढावा
हा संसारगड : हा बिकट उभा चढ
श्रेयाकडे पोचणारा.

पण कुठले काय?
ही तात्पर्ये म्हणजे अगदी मऊसूत
लवचिक.
बसल्या बसल्या वळून लोंबत सोडलेल्या
शेवयांसारखी. सुखासीन.

आजपर्यंतच्या या तात्पर्यांच्या
घनदाट झिरमिळ पडद्यामधे उभी असलेली
मी. एकदा वाटते,
कोण ही कैद!
एकदा वाटते, किती मी सुरक्षित!

गुरुवार, २१ एप्रिल, २०११

सुख बोलत नाही - अनुराधा पाटील

सुख बोलत नाही;
ते कणाकणातून फक्त झिरपत राहतं
कडेकपारीतून ठिबकणा-या सहस्त्रधारेसारखं
फेसाळत्या दुधासारखं ते जिवणीच्या कडेकडेनं सांडत असतं.
तीराला बिलगणा-या फेसासारखं ते नाच-या डोळ्यांतून खेळत असतं.
सुख बोलत नाही;
बोलू शकतही नाही.
आभाळाला ओढून घेणा-या सरोवरासारखं
ते जीवाला स्वत:त ओढून घेतं, लपेटून घेतं.
---- निरोपाच्या थरथरत्या क्षणी बोलू पाहतं ते सुखच असतं
तेव्हाही त्याची भाषा असते हुंकाराची, खुणेची,
डोळ्यांत साकळलेल्या आसवांची
सुख बोलत नाही;
बोलू शकतही नाही.
ते असतं.... फक्त असतं.

मंगळवार, १९ एप्रिल, २०११

उंट - विंदा करंदीकर

क्षितिज नाचले वाळूभवती
वाळु बरळली, ’नाही, नाही.’
अशाच वेळी उंट उगवला;
आणि म्हणाला, ’करीन काही.’
अन मानेच्या बुरुजावरती
चढले डोळे अवघड जागी;
क्षितिज पळाले दूर दूर अन
वाळु जाहली हळूच ’जागी’.
रूप असे पाहुनी अजागळ
भुलले वाळूचे भोळेपण;
आणि तिच्या त्या वांझपणावर
गळला पहिला सृजनाचा क्षण.

उंट चालला वाळूवरुनी
वाळु म्हणाली, ’आहे, आहे.’
...खय्यामाने भरले पेले;
महंमदाने रचले दोहे.
हा यात्रेकरु तिथे न खळला.
निळा पिरॅमिड शोधित जाई!
तहानेसाठी प्याला मृगजळ;
भूक लागता तहान खाई.
निळा पिरॅमिड दिसला का पण?
...खूण तयाची एकच साधी...
निळा पिरॅमिड दिसतो ज्याला
तोच पिरॅमिड बनतो आधी.

गुरुवार, १४ एप्रिल, २०११

का? - संजीवनी बोकील

प्रवाहाविरुध्द पोहून
आटापिटा केला
जे मिळवण्याचा,
ते आता
इतकं अनाकर्षक
का वाटू लागावं?
महत्त्वाकांक्षेला शाप असतो विटण्याला?
कि नजरच बनत जाते बैरागी?