दि. पु. चित्रे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दि. पु. चित्रे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १७ फेब्रुवारी, २०१८

उनाड व्हावे - दि. पु. चित्रे

उनाड व्हावे रक्त इथे अन
डोळ्यांना पालवी फुटावी
अन श्वासांच्या संथ झऱ्यांतून
लकेर हळवी तरळत जावी
झुळझुळणाऱ्या जिवंततेला
मरणाच्या मग खुणा पटाव्या
छातीच्या गहिऱ्या मेघातुन
अदृष्टाच्या विजा पळाव्या
दूर असावे स्वतःपासुनि
स्वतःपणाचा अर्थ नुरावा
फक्त वाहणाऱ्या ओळींना
अशाश्वताचा सूर कळावा
उनाड व्हावे रक्त इथे अन
फक्त निळे आकाश उरावे
तंद्रीच्या धूसर वाऱ्यावर
अन ताऱ्यांचे स्वप्न झुरावे

सोमवार, १४ डिसेंबर, २००९

देवा, ह्याही देशात पाऊस पाड - दि. पु. चित्रे

(दिलीप पुरुषोत्तम चित्रे ह्यांना आदरांजली)


देवा, ह्याही देशात पाऊस पाड

जिथे पाण्याला येतो खुनाचा वास

जिथे हिंसेच्या मळ्यात पिकतो ऊस किंवा ताग

देवा, जिथे तू आहेस तोवर निषिद्ध आहे वैताग

देवा, ह्याही देशात पाऊस पाड

जिथे माणसांचं ख़त घालून समाज उगवतात

जिथे बळी जाणारे तुझ्यावर विश्वास ठेवतात

आणि बळी घेणारे तुझेच अवतार असतात

देवा, ह्याही देशात पाऊस पाड

जिथे दुष्काळही नशिबं फळवून जातात

जिथे माणुसकीची यंत्र अखंड चालू असतात

जिथे परोपकाराचा ओव्हरटाईम सदैव चालतो

देवा, ह्याही देशात पाऊस पाड

कारण इथे भरपूर खाणारे गाणी गातात

आणि ऊपाशी मरणारे त्यांना साथ करतात

जिथे दुश्काळ आणि सुकाळ एकत्र नांदतात

देवा, ह्याही देशात पाऊस पाड