कुसुमाग्रज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कुसुमाग्रज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ७ एप्रिल, २०२२

अनंत - कुसुमाग्रज

 

एकदा ऐकले
    काहींसें असें
असीम अनंत
    विश्वाचे रण
त्यात हा पृथ्वीचा
    इवला कण
त्यांतला आशिया
    भारत त्यांत
छोट्याशा शहरीं
    छोट्या घरांत
घेऊन आडोसा
    कोणी 'मी' वसें
क्षुद्रता अहो ही
    अफाट असें!
भिंतीच्या त्रिकोनी
    जळ्मट जाळी
बांधून राहती
    कीटक कोळी
तैशीच सारी ही
    संसाररीती
आणिक तरीही
    अहंता किती?
परंतु वाटलें
    खरें का सारें?
क्षुद्र या देहांत
    जाणीव आहे
जिच्यात जगाची
    राणीव राहे!
कांचेच्या गोलांत
    बारीक तात
ओतीत रात्रीत
    प्रकाशधारा
तशीच माझ्या या
    दिव्याची वात
पाहते दूरच्या
    अपारतेंत!
अथवा नुरलें
    वेगळेंपण
अनंत काही जें
    त्याचाच कण!
डोंगरदऱ्यांत
    वाऱ्याची गाणीं
आकाशगंगेत
    ताऱ्यांचे पाणीं
वसंतवैभव
    उदार वर्षा
लतांचा फुलोरा
    केशरी उषा....
प्रेरणा यांतून
    सृष्टीत स्फुरे
जीवन तेज जें
    अंतरी झरे
त्यानेच माझिया
    करी हो दान
गणावे कसे हें
    क्षुद्र वा सान?

सोमवार, १४ जानेवारी, २०१३

पाचोळा

आडवाटेला दूर एक माळ
तरू त्यावरती एकला विशाळ
आणि त्याच्या बिलगूनिया पदास
जीर्ण पाचोळा पडे तो उदास

उषा येवो शिंपीत जीवनासी
निशा काळोखी दडवु द्या जगासी
सूर्य गगनातुनि ओतु द्या निखारा
मूक सारे हे साहतो बिचारा

तरूवरची हसतात त्यास पाने
हसे मुठभर ते गवतही मजेने
वाटसरु वा तुडवीत त्यास जात
परि पाचोळा दिसे नित्य शांत

आणि अंती दिन एक त्या वनांत
येइ धावत चौफेर क्षुब्ध वात
दिसे पाचोळा घेरुनी तयाते
नेइ उडवुनि त्या दूर दूर कोठे

आणि जागा हो मोकळी तळाशी
पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०११

जोगीण - कुसुमाग्रज

साद घालशील
तेव्हाच येईन
जितकं मागशील
तितकच देईन

दिल्यानंतर
देहावेगळ्या
सावलीसारखी
निघून जाईन.

तुझा मुगुट
मागणार नाही
सभेत नातं
सांगणार नाही

माझ्यामधल्या
तुझेपणात
जोगीण बनून
जगत राहीन.

गुरुवार, १४ जुलै, २०११

ऋण - कुसुमाग्रज


पदी जळत वालुका 
वर उधाणलेली हवा
जळास्तव सभोवती 
पळतसे मृगांचा थवा

पथी विकलता यदा 
श्रमुनि येतसे पावला
तुम्हीच कवी होदिला 
मधुरसा विसावा मला !

अहो उफळला असे 
भवति हा महासागर
धुमाळुनि मदांध या 
उसळतात लाटा वर,

अशा अदय वादळी 
गवसता किती तारवे
प्रकाश तुमचा पुढे 
बघुनि हर्षती नाखवे !

असाल जळला तुम्ही 
उजळ ज्योति या लावता
असाल कढला असे
प्रखर ताप हा साहता,

उरात जखमातली 
रुधिर-वाहिनी रोधुनी
असेल तुम्हि ओतली 
स्वर-घटात संजीवनी !

नकोत नसली जरी 
प्रगट स्मारकांची दळे
असंख्य ह्रदयी असती
उभी आपुली देवळे

बुधवार, २३ फेब्रुवारी, २०११

स्वगत - कुसुमाग्रज

शब्द - जीवनाची अपत्ये -
मृत्यूपर्यंत पोहोचत नाहीत
म्हणून तुझ्या समाधीवर
मी वाहात आहे
माझे मौन

मृत्यूसारखेच अथांग
अस्पष्ट, अनाकार
सारे आकाश व्यापून
अज्ञाताच्या प्रदेशाकडे
प्रवाहात जाणा-या
स्वरहीन संथ मेघमालेचे
मौन

सोमवार, १२ जुलै, २०१०

माणुसपण - कुसुमाग्रज


प्रसन्न झाला देव मानवा
म्हणे, ’माग तुज काय हवे ते’,
’शस्त्र हवे मज’, माणूस वदला
’साध्य सर्व हो पराक्रमाते’


शस्त्र मिळाले, हो समरांगण
अवघ्या भूचे हृदय विदारी
माखुनिया रक्तात राहिला
पुन्हा उभा देवाच्या द्वारी!


’काय हवे तुज ?’ शस्त्र न पुरते-
करील शास्त्रच मंगल जीवन
ज्ञानसाधनी ये ईश्वरता
स्वर्गधरेचे करीन मीलन


शास्त्र मिळाले, शस्त्र मिळाले
स्वर्ग परी स्वप्नातच राही.
मानव हतबल आणिक हताश
पुन्हा प्रभुच्या सन्निध येई.


’काय हवे तुज ?’, ’वावरलो मी-
वाट दिसेना या तिमिरांतून
देव म्हणे, तुज जवळीच आहे
दीप लाव तो, तव माणुसपण!


लोकसत्ता. मंगळवार, २ ऑगस्ट २००५

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २००९

माझे जगणे होते गाणे - कुसुमाग्रज,

माझे जगणे होते गाणे

सुरेल केंव्हा, केंव्हा बेसुर
तालावाचून वा तालावर
कधी तानांची उनाड दंगल
झाले सुर दिवाणे

कधी मनाचे कधी जनाचे
कधी धनास्तव कधी बनाचे
कधी घनाशय कधी निराशय
केवळ नादतराणे

आलापींची संथ सुरावळ
वा रागांचा संकर गोंधळ
कधी आर्तता काळजातली
केंव्हा फक्त बहाणे

राईमधले राजस कूजन
कधी स्मशानामधले क्रन्दन
अजाणतेचे अरण्य केंव्हा
केंव्हा शब्द शहाणे

जमले अथवा जमले नाही
खेद खंत ना उरली काही
अदॄश्यातिल आदेशांचे
ओझे फक्त वाहणे

सुत्रावाचून सरली मैफल
दिवेही विझले सभागॄहातिल
कशास होती आणि कुणास्तव
तो जगदीश्वर जाणे

बुधवार, ४ फेब्रुवारी, २००९

निर्माल्य

होता मोहरला व संत वितरी मार्गावरी तो फुले
होते धुंद सुवास ते चहुकडे विश्वामधे दाटले,
स्वप्नांच्या कमली अलीपरि दडे रात्री सुके अन्तर
आणि पंख उभारवून दिवसा झापू बघे अम्बर !

वेशी दृष्टिपथात तू जणु उभी प्राचीवरी हो उषा
झाला आरुण जीवनौघ, भरला आल्हाद दाही दिशा
मूर्ती मोहक गौर, गोल सुख अन् किंचित निळ्या लोचनी
वाहे मन्थर आणि जीवनमयी त भावमन्दाकिनी !

साधी वेषतर्‍हा तयातहि खुले ती आकृती लालस
डोळ्यातूनच भावबन्ध जडले-प्रीती असे डोळस !
जाण्याला निघसी अचानक पुढे, व्याकूलसी पाहुनी,
गंगा लोपुनी गर्जना करित तो सिंधूच नेत्रांतुनी !

आणी गेलिस तू-वसन्तहि सखे गेला तुझ्या संगती,
पुष्पातील उडून गंध उरले निर्माल्य हे भोवती !

शनिवार, ३१ जानेवारी, २००९

बायरन - कुसुमाग्रज

वेगे आदळती प्रमत्त गिरिशा लाटा किनाऱ्यावरी
पाषाणी फुटती पिसूनि कणिका लक्षावधी अम्बरी
आणी झिंगुनि धावती पुनरपी झुंजावया मागुनी
भासे वादळ भव्य उग्र असले त्या गर्व-गीतातुनी !

अभ्रांच्या शकलांमधून तळपे, भासे जसा भास्कर
शब्दाआडुनही त्वदंतर दिसे उन्मत्त अन् चंचल !
केव्हा बद्ध सुपर्ण पंख उधळी तोडावया अर्गल
केव्हा नाजुक पाकळ्यात अडके बागेतला तस्कर !

काळाच्या कवि, वालुकेवरि तुवा जी रोवली पावले
नाही दर्शविण्यास शक्त पथ ती-आणी नसो ती तरी
आहे आग जगातली जरि नसे संगीत स्वर्गातले
तत्त्वांचा बडिवार नाहि अथवा ना गूढशी माधुरी.

जेथे स्थण्डिल मानसी धगधगे विच्छिन्न मूर्तीपुढे
तेथे शिंपिल शारदा तव परी शीतोदकाचे सडे !

मातीची दर्पोक्ति - कुसुमाग्रज

घनधार मृगाचा प्राशुनिया पर्जन्य
त्या तृषार्त भूवर आले नव चैतन्य,
उन्माद चढे, तो दर्प दर्वळे भोती
थरथरा कापली वर दर्भाची पाती
ते सुस्त धूलिकण गाउ लागले गीत

कोलाहल घुमला चहूकडे रानात-
अभिमानी मानव ! आम्हाला अवमानी !
बेहोष पाउले पडती अमुच्यावरुनी
त्या मत्त पदांना नच जाणीव अजूनी
की मार्ग शेवटी सर्व मातिला मिळती
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
दर्पणी पाहु द्या रमणि रूप दर्पात
वा बाहू स्फुरु द्या बलशाली समरात
पांडित्य मांडु द्या शब्दांचा आकांत

ते रूप, बुद्धि ती, शक्ति, आमुची भरती,
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
कित्येक शिकंदर जग जिंकुनिया गेले
कित्येक वाल्मिकी अखेर इकडे आले
कित्येक मनू अन् मुनी धुळीने गिळले
स्मृतितीलहि त्यांच्या ओळी अंधुक होती
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
पाहून हासु ये तुमचे ताजमहाल
अन् गर्व किती तो ! काल काय जिंकाल ?

शेकडो ताजही जिथे शोभले काल
ती प्रचंड नगरे आज आमुच्या पोटी
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
धनवंत असू द्या, असु द्या दीन भिकारी
कुणि संत असू द्या वा पापी व्यभिचारी
इकडेच वाहते सर्वांची रहदारी
हो भस्म चितेवर सारी नीति-अनीति
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
मरणोत्तर वाटे होइल आशापूर्ति

स्वर्गीय मंदिरें घ्यायाला विश्रांति
लाभेल प्रभूची वा प्रमदांची प्रीति
त्या व्याकुल मतिला इथेच अंतिम शांती
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
ही क्षुद्र बाहुली कोण करी निर्माण ?
बेताल नाचवी, सूत्रधार हा कोण ?
मातीतच अंती त्याचेही निर्वाण ?
स्वामित्व जगाचे अखेर अमच्या हाती
मातीवर चढणे एक नवा थर अंती !

गुरुवार, २९ जानेवारी, २००९

जा जरा पूर्वेकडे ! - कुसुमाग्रज

(चीन-जपानी युद्धांत चाललेले राक्षसी अत्याचार या कवितेत अभिप्रेत आहेत।)

जा जरा पूर्वेकडे !

वाळवण्टी कोरता का एक श्वानाचे मढे ?
जा गिधाडांनो, पुढे
जेथ युद्धाची धुमाळी गंज प्रेताचा पद
जा जरा पूर्वेकडे !

आणि रक्ताच्या नद्या हो वाहती धारोष्णशा
भागवा तेथे तृषा,
ढीग साराया शवांचा तेथ लागे फावडे,
जा जरा पूर्वेकडे !

गात गीते जाउ द्या हो थोर तांडा आपुला,
देव आहे तोषाला
वर्षता त्याचा दयाब्धी राहता का कोरडे ?
जा जरा पूर्वेकडे !

तेथ देखा आग वेगाने विमाने वर्षती,
थोर शास्त्रांची गती
धूळ आणि अग्नि यांच्या दौलती चोहीकडे
जा जरा पुर्वेकडे !

खङ्ग लावूनी उराला बायकांना वेढती,
आणि दारी ओढती,
भोगती बाजार-हाटी मांस आणि कातडे
जा जरा पूर्वेकडे !

आर्त धावा आइचा ऐकून धावे अर्भक
ना जुमानी बंदुक
आणि लोंबे संगिनीला छान छोटे आतडे
जा जरा पूर्वेकडे !

हा दयेने ईश्वराच्या काळ आहे चालता,
व्यर्थ येथे राबता,
व्यर्थ तेथे शोणिताचे वाहुनी जाती सडे
जा जरा पूर्वेकडे !

आणि येताना पवाडे संस्कृतीचे गा जरा,
डोलु द्या सारी धरा,
मेघमालेतून आम्हा शांततेचे द्या धडे
जा जरा पूर्वेकडे !

जालियनवाला बाग - कुसुमाग्रज

रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनि क्रुसावरचे
विरले ना ध्वनि तुझ्या प्रेषिता, अजुनी शब्दांचे

मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष-
"प्रेम, शांती अन् क्षमा यामधे वसतो परमेश !"

आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात
निःशस्त्रांच्या रक्तामांसामधे नाहतात

मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकात
जगजेत्यांच्या प्रराक्रमाची स्फूर्तिप्रद रीत !

पाचोळ्यापरि पडली पाहुन प्रेतांची रास
नयन झाकले असशिल देवा, तूं अपुले खास;

असेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात
एक जखम अन् नवीन येशू, तुझ्या काळजांत !

शुक्रवार, १९ सप्टेंबर, २००८

नवलाख तळपती दीप विजेचे येथ

नवलाख तळपती दीप विजेचे येथ


नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा
त्या माजघरातिल मंद दिव्याची वात !

वाऱ्यावर येथिल रातराणि ही धुंद
टाकता उसासे, चरणचाल हो मंद
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
त्या परसामधला एकच तो निशिगंध !

हेलावे भवती सागर येथ अफाट
तीरावर श्रीमान इमारतींचा थाट
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तो नदीकिनारा आणि भंगला घाट !

बेहोष चढे जलशांना येथिल रंग
रुणझुणता नूपुर जीव बने निःसंग
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तो आर्त मला जो ऐकविलास अभंग !

लावण्यवतींचा लालस येथे विलास
मदिरेत माणकापरी तरारे फेस
परि स्मरती आणिक करती व्याकुळ केव्हा
ते उदास डोळे, त्यातिल करुण-विलास !

सोमवार, १५ सप्टेंबर, २००८

निरोप - कुसुमाग्रज

( पुढील कविता ही माझा मित्र आणि ह्या संग्रहाचा सह-संकलक - किरण रानडे - ह्याच्या आईच्या स्मरणानुसार उद्धृत करीत आहे. जाणकारांकडून सुधारणांची अपेक्षा आहे. माझे श्वसुर - श्री. शशिकांत दात्ये - ह्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ह्या कवितेची पार्श्वभूमी ही फाळणीच्या काळात पूर्व पाकिस्तानात घडलेल्या एका प्रसंगाची आहे. पूर्व पाकिस्तानातून फाळणीनंतर भारतात यायला निघालेल्या एका विमानात एक माता आपल्या कोवळ्या मुलाला सोडून देते, असा काहिसा तो प्रसंग होता. ह्याही संदर्भात कुणा जाणकार रसिकांस काही माहिती असेल तर ती अवश्य द्यावी.)

गर्दीत बाणासम ती घुसोनि
चाले, ऊरेना लव देहभान
दोन्ही करांनी कवटाळूनीया
वक्ष:स्थळी बालक ते लहान

लज्जा न, संकोच नसे, न भीती
हो दहन ते स्त्रीपण संगरात
आता ऊरे जीवनसूत्र एक
गुंतोनी राहे मन मात्र त्यात

बाजार येथे जमला बळींचा
तेथेही जागा धनिकांस आधी
आधार अश्रूसही दौलतीचा
दारिद्र्य दु:खा दुसरी उपाधी

चिंध्या शरीरावरी सावरोनी
राहे जमावात जरा उभी ती
कोणी पहावे अथवा पुसावे?
एकाच शापातून सर्व जाती

निर्धार केला कसला मानसी
झेपाउनी ये ठिणगीप्रमाणे
फेकूनिया बाळ दिले विमाने
व्हावे पुढे काय प्रभूच जाणे

"जा बाळा जा, वणव्यातुनी या
पृथ्वीच आई पुढती तुझी रे
आकाश घेईं तुजला कवेंत
दाही दिशांचा तुज आसरा रे"

ठावे न कोठे मग काय झाले
गेले जळोनीं मन मानवाचे
मांगल्य सारे पडले धुळीत
चोहीकडे नर्तन हिंस्त्रतेचे!

बुधवार, ६ फेब्रुवारी, २००८

अनामवीरा - कुसुमाग्रज

अनामवीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात

धगधगता समराच्या ज्वाला या देशासाठी
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव

जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान
सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान

काळोखातूनी विजयाचा हे पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्यूंजय वीरा

गुरुवार, १४ जून, २००७

कविता - कुसुमाग्रज

दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता
वाहते जिच्यातून त्याची जीवन सरिता

खळखळे अडखळे सुके कधी फेसाळॆ
परी अखंड शोधे वाट समुद्राकरिता

खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली
पथ शोधित आली रानातून अकेली

नच रम्य राउळे कलापूर्ण वा घाट
तीरावर तुरळक परी अंकुरती वेली

नव पर्णांच्या ह्या विरळ मांड्वाखाली
होईल सावली कुणा कुणास कहाली

कोपेल कुणी शापील कुणी दुर्वास
ह्या जळोत समिधा भव्य हवी व्रुक्षाली

"समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा,
कोठून फुलांपरि वा मकरंद मिळावा ?

जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा
तव आन्तर अग्नी क्षणभर तरि फुलवावा!"

गुरुवार, १७ मे, २००७

कोलंबसाचे गर्वगीत - कुसुमाग्रज

कोलंबसाचे गर्वगीत

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारे
विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे

ताम्रसुरा प्राशुन मातु दे दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविता
आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता

की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनि मेळा वेताळांचा या दरियावरती करी हे तांडव थैमान

पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालु दे फुटु दे नभ माथ्यावरती
आणि तुटु दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती

सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हांला धाम

काय सागरी तारु लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा
त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी, जपावे पराभूत प्राणा?

कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती

मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"

गुरुवार, १० मे, २००७

सरणार कधी रण - कुसुमाग्रज

सरणार कधी रण

सरणार कधी रण प्रभू तरी
हे कुठवर साहू घाव शिरी

दिसू लागले अभ्र सभोती
विदीर्ण झाली जरी ही छाती
अजून जळते आंतर ज्योती
कसा सावरु देह परी

होय तनूची केवळ चाळण
प्राण उडाया बघती त्यातून
मिटण्या झाले अधीर लोचन
खङग गळाले भूमीवरी

पावन खिंडीत पाऊल रोवून
शरीर पिंजेतो केले रण
शरणागतीचा अखेर ये क्षण
बोलवशील का आता घरी

शुक्रवार, २० एप्रिल, २००७

स्वातंत्र्यदेवीची विनवणी - कुसुमाग्रज

स्वातंत्र्यदेवीची विनवणी

पन्नशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका ।
मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका ॥

सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे ।
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका ॥

अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका ।
अंध प्रथांच्या कुजट कोठारी दिवाभीतासम दडू नका ॥

जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा ।
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका ॥

वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे ।
करतील दुसरे, बघतील तिसरे असे सांगुनी सुटू नका ॥

जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा ।
मेजाखालून, मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका ॥

बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना ।
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका ॥

सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने ।
करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका ॥

प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे ।
इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका ॥

पाप कृपणता, पुण्य सदयता, संतवाक्य हे सदा स्मरा ।
भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका ॥

मंगळवार, १७ एप्रिल, २००७

प्रेम - कुसुमाग्रज

पुरे झाले चंद्रसूर्य
पुऱ्या झाल्या तारा
पुरे झाले नदीनाले
पुरे झाला वारा

मोरासारखा छाती काढून उभा रहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा
सांग तिला तुझ्या मिठीत
स्वर्ग आहे सारा

शेवाळलेले शब्द आणिक
यमकछंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण
इंद्रधनू बांधील काय?

उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत रहाशील फिरत
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगिनचिठ्ठी
आल्याशिवाय राहील काय?

म्हणून म्हणतो जागा हो
जाण्यापूर्वी वेळ
प्रेम नाही अक्षरांच्या
भातुकलीचा खेळ

प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत रहाणं

प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवूनसुद्धा
मेघापर्यंत पोचलेलं

शव्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस
बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस

उधळून दे तुफान सगळं
काळजामध्ये साचलेलं
प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं