सोमवार, २८ फेब्रुवारी, २०११

सहजखूण - शांता शेळके

सहज फुलू द्यावे फुल सहज दरवळावा वास
अधिक काही मिळवण्याचा करू नये अट्टाहास
सुवास, पाकळ्या, पराग, देठ - फुल इतकीच देते ग्वाही
अलग अलग करू जाता हाती काहीच उरत नाही

दोन पावलांपुरते जग तेच अखेर असते खरे
हिरवीगार हिरवळ तीच, त्याच्यापुढे काय उरे?
पुढे असते वाळवंट फक्त, करडे, रेताड आणि भयाण
निर्वात पोकळीमध्ये अश्या गुदमरून जातात प्राण

फुल खरे असेल तर सुवास तोही आहे खरा
वाळूइतकाच खरा आहे वाळूमधला खोल झरा
थेंबामध्ये समुद्राची जर पटते सहजखूण
सुंदराचा धागा धागा कशासाठी घ्यावा उकलून?

रविवार, २७ फेब्रुवारी, २०११

त्या दिसा वडाकडेन - बा. भ. बोरकर

त्या दिसा वडाकडेन गडद तिनसाना
मंद मंद वाजत आयली तुझी गो पैंजणा

मौन पडले सगल्या राना
शिरशिरुन थांबली पाना
कवळी जाग आयली तणा झेमता झेमताना

पैसूल्यान वाजली घाट
दाटलो न्हयचो कंठ काठ
सावळ्यानी घमघमाट सुटलो त्याखीणा

फुलल्यो वैर चंद्र ज्योती
रंगध्रानी लागल्यो वाती
नवलांची जावक लागली शकुन लक्षणा

गळ्या सुखा, दोळ्या दुखा
लकलकली जावन थीका
नकळतान एक जाली आमी दोगाय जणा

वड फळांच्या अक्षदांत
कितलो वेळ न्हायत न्हायत
हुकलो कितलो चंद्रलोक इंद्रनंदना

तांतले काय नुल्ले आज
सगल्या जिणे आयल्या सांज
तरीय अकस्मात तुजी वाजती पैंजणा

कानसूलानी भोवती भोवर
आंगर दाट फुलता चवर
पट्टी केन्ना सपना तीच घट्ती जागरना

त्या दिसा वडाकडेन गडद तिनसना
मंद मंद वाजत आयली तुझी गो पैंजणा

एक आनंदयात्रा कवितेची - पु. ल. देशपांडे आणि सुनिता देशपांडे
अंदाजे १९८४/८५ साली बोरकरांच्या कवितांवर या दोघांनी कार्यक्रम केला होता.

शनिवार, २६ फेब्रुवारी, २०११

निळेसावळे - इंदिरा संत

निळेसावळे आभाळ भरून ओथंबून
तसे माझे शब्द...घनगर्द
ओठांवर येता येता पांढरेभक्क झाले,
हलक्या हलक्या कवड्या झाले,
खुळखुळ वाजायला लागले,
पांढरेशुभ्र बगळे होऊन ओठांवरून उडून गेले....
तेव्हा
मीच मनाचे ओठ घट्ट मिटून टाकले क्षितिजासारखे.

शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०११

तक्ता - अरुण कोलटकर

अननस, आई, इजार आणि ईडलिंबू
उखळ, ऊस आणि एडका
सगळे आपापले चौकोन संभाळून बसलेत

ऎरण, ओणवा, औषध आणि आंबा
कप, खटारा, गणपती आणि घर
सगळ्यांच्या स्वत:च्या मालकीच्या जागा आहेत

चमचा, छत्री, जहाज आणि झबलं
टरबूज, ठसा, डबा, ढग आणि बाण
सगळे आपापल्या जागी ठाण मांडून बसलेत

तलवार, थडगं, दौत, धनुष्य आणि नळ
पतंग, फणस, बदक, भटजी आणि मका
यांचा एकमेकाला उपद्रव होण्याची शक्यता नाही

यज्ञ , रथ, लसूण, वहन आणि शहामृग
षटकोन, ससा, हरिण, कमळ आणि क्षत्रिय
या सगळयांनाच अढळपद मिळालंय

आई बाळाला उखळात घालणार नाही
भटजी बदकाला लसणाची फोडणी देणार नाही
टरबुजाला धडकून जहाज दुभंगणार नाही

शहामृग जोपर्यंत झबलं खात नाही
तोपर्यंत क्षत्रिय पण गणपतीच्या पोटात बाण मारणार नाही
आणि एडक्यानं ओणव्याला टक्कर दिली नाही
तर ओणव्याला थडग्यावर कप फोडायची काय गरजाय

रॉय किणीकर

या पाणवठ्यावर आले किति घट गेले
किति डुबडुबले अन बुडले वाहुनि गेले
किति पडुनि राहिले तसेच घाटावरती
किति येतिल अजुनि नाही त्यांना गणती

मी शब्द परंतू मूर्तिमंत तू मौन
मी पंख परंतू क्षितिजशून्य तू गगन
काजळरेघेवर लिहिले गेले काही
(अन) मौनाची फुटली अधरावरती लाही

शहाण्या शब्दांनो हात जोडतो आता
कोषात जाउनी झोपा मारीत बाता
रस रुप गंध अन स्पर्श पाहुणे आले
घर माझे नाही, त्यांचे आता झाले

वाकला देह वाकली इंद्रिये दाही
चिरतरुण राहिली देहातील वैदेही
मन नाचविते अन नेसविते तिज लुगडी
मन नपुंसक खेळे शृंगाराची फुगडी

हा देह तुझा पण देहातिल तू कोण
हा देह तुझा पण देहाविण तू कोण
हा देह जन्मतो वाढत जातो सरतो
ना जन्म मरण ना देहातील तो म्हणतो

पाहिले, परंतु ओळख पटली नाही
ऐकले, परंतु अर्थ न कळला काही
चाललो कुठे पायांना माहीत नव्हते
झोपलो, परंतु स्वप्न न माझे होते

कोरून शिळेवर जन्म-मृत्युची वार्ता
जा ठेव पणती त्या जागेवर आता
वाचिल  कुणीतरी होताना उत्खनन
म्हणतील, कोण हा, कशास त्याचे स्मरण?’

ही युगायुगांची आहे अक्षर यात्रा
एकदाच भरते स्माशानाताली जत्रा
खांद्यावर घेउनि शव फिरतो जन्म
राखेत अश्रुला फुटला हिरवा कोंब

बुधवार, २३ फेब्रुवारी, २०११

मला टोचते मातीचे यश - विंदा करंदीकर

श्रावणातले ऊन रेशमी
आकाशाला बांधून ठेवी
घट्ट धरेशी
सह्याद्रीच्या गळ्यात पडती
श्रावणतल्या सरी सराईत
ओलेत्याने
आणि ओणव्या माळालाही
हंबरणारा अवखळ वारा
ढुशी मारतो भलत्या जागी
अडचणीतल्या पाऊलवाटा
अंग चोरुनी हळूच पळती
माझ्या जवळून
मजला टाळून
- ब्रम्ह जाहले धरणीला वश
अशा प्रसंगी
आत कुठेसे
मला टोचते मातीचे यश

रुपकळा - बा.भ.बोरकर

प्रति एक झाडामाडा
त्याची त्याची रुपकळा
प्रति एक पाना फुला
त्याचा त्याचा तोंडवळा

असो पाखरु मासोळी
जीव जिवार मुंगळी
प्रत्येकाची तेवठेव
काही आगळी वेगळी

असो ढग असो नग
त्याची अद्भुत रेखणी
जी जी उगवे चांदणी
तिच्या परिने देखणी

उठे फुटे जी जी लाट
तिचा अपूर्वच घाट
फुटे मिटे जी जी वाट
तिचा अद्वितीय घाट

भेटे जे जे त्यात भरे
अशी लावण्याची जत्रा
भाग्य केवढे, आपुली
चाले यातुनच यात्रा

आवाहन - दत्ता हलसगीकर

ज्यांची बाग फुलून आली
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळून आले
त्यांनी दोन गाणी द्यावीत
ज्यांच्या अंगणात झुकले ढग
त्यांनी ओंजळपाणी द्यावे
आपले श्रीमंत हृदय त्यांनी
रिते करुन भरुन घ्यावे
आभाळाएवढी ज्यांची उंची
त्यांनी थोडे खाली यावे
मातीत ज्यांचे जन्म मळले
त्यांना थोडे उचलून घ्यावे

स्वगत - कुसुमाग्रज

शब्द - जीवनाची अपत्ये -
मृत्यूपर्यंत पोहोचत नाहीत
म्हणून तुझ्या समाधीवर
मी वाहात आहे
माझे मौन

मृत्यूसारखेच अथांग
अस्पष्ट, अनाकार
सारे आकाश व्यापून
अज्ञाताच्या प्रदेशाकडे
प्रवाहात जाणा-या
स्वरहीन संथ मेघमालेचे
मौन

तळ्याकाठी - अनिल

अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते
जिथे शांतता स्वत:च निवारा शोधीत थकून आली असते
जळाआतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही
गळून पडत असताना पान मुळी सळसळ करीत नाही
सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत
उगीच उसळी मारून मासळी मधूनच वर नसते येत
पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो
दूर कोपर्‍यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो
हृदयावरची विचाराची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते !

रविवार, २० फेब्रुवारी, २०११

दिवे लागले रे - शंकर रामाणी

दिवे लागले रे, दिवे लागले रे,
तमाच्या तळाशी दिवे लागले;
दिठीच्या दिशा खोल तेजाळतांना
कुणी जागले रे? कुणी जागले?

रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी
असे झाड पैलाड पान्हावले;
तिथे मोकळा मी मला हुंगितांना
उरी गंध कल्लोळुनी फाकले...

उभ्या रोमरोमांतुनी चैत्रवाटा
कुणी देहयात्रेत या गुंतले?
आरक्त त्याच्या कृपेच्या कडा अन
उष:सूक्त ओठात ओथंबले...

चाफ्याच्या झाडा - पद्मा

चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा,
का बरं आलास आज स्वप्नात
तेव्हांच तर आपलं नव्हतं का ठरलं?
दु:ख नाही उरलं आता मनात

पानांचा हिरवा, फुलांचा पांढरा
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात
केसात राखडी, पायात फुगडी
मी वेडीभाबडी तुझ्या मनात

चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा,
नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळखीच्या सुरात, ओळखीच्या तालात
हादग्याची गाणी नको म्हणू

तुझ्याच आळ्यात एक पाय तळ्यात,
एक पाय मळ्यात खेळलेय ना?
जसं काही घोड्यावर तुझ्याच फांद्यावर
बसून आभाळात हिंडलेय ना?

चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा,
पानात, मनात खुपतय ना?
काहीतरी चुकतय, कुठं तरी दुखतय
तुलाही कळतंय, कळतंय ना?

चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा,
हसून सजवायच ठरलय ना?
कुठं नाही बोलायचं, मनात ठेवायचं.
फुलांनी ओंजळ भरलीयं ना?

ही कविता कवितांजली मध्ये सुनिता देशपांडे ह्यांनी अप्रतिम सादर केली आहे.

गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०११

किती पायी लागू तुझ्या - बा.सी.मर्ढेकर

किती पायी लागू तुझ्या
किती आठवू गा तूंते
किती शब्द बनवू गा
अब्द अब्द मनी येते

काय गा म्या पामराने
खरडावी बाराखडी
आणि बोलावी उत्तरे
टिनपट वा चोमडी

कधी लागेल गा नख
तुझे माझिया गळ्याला
आणि सामर्थ्याचा स्वर
माझिया गा व्यंजनाला !

ते दिवस आता कुठे - अरुण म्हात्रे

ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची
दूर ती गेली तरीही सावली भेटायची
त्या तिच्या वाटेवरी ती झिंगती झाडे जुनी
हात देताना तिला माझीच फांदी व्हायची
पावसाला पेच होता ह्या सरी वळवू कुठे
चिंबताना त्या पुलाखाली ती नदी थांबायची
वर निळी कौले नभाची डोंगराची भिंत ती
ते नदीकाठी भटकणे हीच शाळा व्हायची
जीर्ण ह्या पत्रातुनी मी चाळतो मजला असे
ती जशी हलक्या हाताने भाकरी परतायची
गवतही भोळे असे की साप खेळू द्यायचे
सोडताना गाव त्यांची कात हिरवी व्हायची
फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी
पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची

मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०११

आपल्यामध्ये जुळू लागलेल्या - आसावरी काकडे

आपल्यामध्ये जुळू लागलेल्या
नव्या नात्याची चिमुकली नाव
संभ्रमाच्या अथांग पाण्यात घालताना
मी कसनुशी झाले आहे !
माझे सज्ज सुकाणू
मी सर्व ताकदीनिशी
हातात गच्च धरून ठेवले आहे.
अनेकांच्या सवयीचे असलेले
हे पाणी तितकेसे गढूळ नाही.
शिवाय
दुरुन दिसणारी आतली खळबळ
आणि बसणारे हेलकावे
यांना न जुमानता
आतापर्यंत अनेक नावा
पैलतीरापर्यंत सुखरुप गेल्याच्या
कितीतरी नोंदी
परंपरेच्या बासनात
स्वच्छ नोंदलेल्या आहेत !
तरीही
पाणी संभ्रमाचेच आहे
आणि आपली पुरती ओळखही नाही
आपल्या सुकाणूची ताकद
आपण आजमावलेली नाही
आणि आपल्या सामानाचेही
आपल्याला हवी तशी माहीती नाही !
एकमेकांच्या सोबतीनं
थोडं पुढे गेल्यावर,
आपले अंदाज चुकले
आणि नाव हेलकावे घेऊ लागली
तर कुणाच्या स्वप्नांचे ओझे कमी करायचे
हेही आपले ठरलेले नाही !
म्हणुन
मी जरा बावरलेच आहे
आपली चिमुकली नाव
या अथांग पाण्यात घालताना !

अगदी एकटं असावं - आसावरी काकडे

माती बाजूला सारत
उगवून येताना

आणि नि:संगपणे
गळून पडताना

अगदी एकटं असावं
दु:खागत निमूट गळणा-या
पागोळ्यांकडे
कुणी पाहात नसावं !

शनिवार, १२ फेब्रुवारी, २०११

कुणा काही देता देता - वासंती मुझुमदार

कधी रिकाम्या हातात
भरली सुरई यावी
डोळे मिटून चालता
स्वप्नगुंफा गवसावी

शून्य शून्य नजरेला
क्षितीजाचा रंग यावा
पावसाच्या थेंबातून
रुपगंधी अर्थ यावा

कधी काही ओलांडता
पाया रुतावी हिर्वळ
कुणा काही देता देता
पुन्हा भरावी ओंजळ

सोमवार, ७ फेब्रुवारी, २०११

असेल जेव्हा फुलावयाचे - विंदा करंदीकर

असेल जेव्हा फुलावयाचे
तुझ्याचसाठी फुल सखे तू
फुल सखे तू फुलण्यासाठी;
फुल मनातिल विसरून हेतू.

या हेतूला गंध उद्याचा;
या हेतूची किड मुळाला;
फुल सखे तू फुलण्यासाठी;
या हेतूचा चुकवून डोळा.

फुल सखे होउन फुलवेडी;
त्या वेडातच विझव मला तू.
विझव नभाच्या आळवावरचे;
स्थळ-कालाचे हळवे जंतू.

अंतरिक्ष फिरलो पण - म.म.देशपांडे

अंतरिक्ष फिरलो पण
गेली न उदासी
गेली न उदासी
लागले न हाताला
काही अविनाशी
काही अविनाशी

क्षितीज तुझ्या चरणांचे
दिसते रे दूर
दिसते रे दूर
घेऊनि मी चालु कसा
भरलेला ऊर
भरलेला ऊर

जरि वाटे जड कळले
तळ कळला नाही
तळ कळला नाही
जड म्हणते, " माझा तू "
क्षितीज म्हणे. " नाही"
क्षितीज म्हणे. " नाही"

अंतरिक्ष फिरलो पण
गेली न उदासी
गेली न उदासी

कळत नाही - म.म.देशपांडे

छातीवर दगड जरी ठेवला
तरी ही हिरवी पाने
कुठून फुटतात कळन नाही

कितीहि म्हटले की मी सुखी आहे
तरी माझ्या गीतातून
मन का रडते कळत नाही

कुणा अव्यक्ताशी माझे नाते जडले आहे
म्हणून मी माझा नाही
आणि सये, तुझाहि नाही

छातीवर दगड जरी ठेवला
तरी ही हिरवी पाने
कुठून फुटतात कळन नाही

रविवार, ६ फेब्रुवारी, २०११

गझल उपदेशाचा - विंदा करंदीकर

तो चंद्र छाटो काहिही अन सूर्य काहीही भको;
मातीच पायाखालती, नाते तिचे विसरू नको.

आत्मास आत्म्याचे मिळे; ते कोण घेईल काढुनी?
पण इंद्रिया दरडावुनी शरिरास तू हिणवू नको

मोठ्यास मोठे मान तू, त्याहून मोठे चिंतता;
पण आपणाही फार छोटे तू उगा मानू नको

खोटा गळा काढू नको; खोटा टिळा लावू नको;
जीव जडतो त्या ठिकाणी पाय तू अडवू नको.

विवेक, संयम, नम्रता असले सदाचे सोबती,
तरि व्हायचे वेडे जिथे तेथे मढे होऊ नको.

खुश्शाल जा तू मंदिरी, त्याला-तिला देण्या फुले;
पण त्यातल्या एका फुला हुंगावया विसरु नको.

पोचायचे जेथे तिथे ना ऊन आणिक सावली,
म्हणुनी वडाच्या खालती अस्वस्थ तू होऊ नको.

वेड्याचे प्रेमगीत - विंदा करंदीकर

येणार तर आत्ताच ये;
येणार तर आत्ताच ये;
उद्या तुझी जरूर काय?
... आज आहे सूर्यग्रहण;
आज मला तुझा म्हण;
उद्या तुझी जरूर काय?
बेकारीच्या खुराकावर
तुझी प्रीती माजेल ना?
सूर्याच्या या तव्यावरती
चंद्राची भाकर भाजेल ना?
... भितेस काय खुळे पोरी;
पाच हात नवी दोरी
काळ्या बाजारात उधार मिळेल.

सात घटका सात पळे
हा मुहूर्त साधेल काय?
संस्कृतीचे घटिकापात्र
दर्यामधे बुडेल काय?
... उद्याच्या त्या अर्भकाला
आज तुझे रक्त पाज;
... भगवंताला सारी लाज.
येणार तर आत्ताच ये;
अंधाराच्या मांडीवरती
जगतील सात, मरतील सात;
आकाश आपल्या डोक्यावर
पुन:पुन्हा मारील हात.
... भरल्या दु:खात रडू नये;
येणार तर आत्ताच ये;
येणार तर आत्ताच ये;
उद्या तुझी जरूर काय?

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११

आपणच आपल्याला - अनुराधा पाटील

आपणच आपल्याला लिहीलेली
पत्र वाचता वाचता
ओले होणारे डोळे पुसून
फडफडू द्यावीत वा-यावर पानं

थोडंसं हसून आपणच आपल्याला
सांगावी कधी तरी एखादी गोष्ट
आपणच गावं आपल्यासाठी
रिमझिमत्या स्वराचं एखादं गाणं

आपणच जपावेत मनात
वा-यावर झुलणारे गवताचे तुरे
एखादी दूरात धावणारी पायवाट
जपावेत काही नसलेले भास

जिथे आपल्यासाठी फुलं उमलतील
अशी जागा सगळ्यांनाच सापडत नाही
मनाच्या कडेनं लावलेल्या झाडांना
आपणच द्यावेत थोडेसे श्वास

मैत्रिण - शांता शेळके

स्वप्नातल्या माझ्या सखी
कोणते तुझे गाव?
कसे तुझे रंगरुप
काय तुझे नाव?

कशी तुझी रितभात?
कोणती तुझी वाणी?
कसे तुझ्या देशामधले
जमीन, आभाळ, पाणी?

लव्ह्याळ्याच्या मुळांतून
झिरपताना पाणी
त्यात पावले बुडवून तू ही
गुणगुणतेस का गाणी?

सुगंधित झुळका चार
केसांमध्ये खोवून
तू ही बसतेस ऊन कोवळे
अंगावर घेऊन?

काजळकाळ्या ढगांवर
अचल लावून दृष्टी
तू ही कधी आतल्याआत
खूप होतेस कष्टी?

कुठेतरी खचित खचित
आहे सारे खास,
कुठेतरी आहेस तू ही
नाही नुसता भास.

वासंती मुझुमदार

१.

रिमझिम
झडी
बौछार...
ही तुझीच अलोलिक रुपं
म्हणून मला सगळीच अति प्रिय.

कधी अनपेक्षितपणे रुप पालटून
आलास ना :
सनेही होऊन,
सोहन होऊन,
ललितसुंदर होऊन,
तर कधी भैरव होऊन, भीम होऊन,
कधी तर जोगिया होऊन,
अगदी फक्कड होऊनदेखील...

तरी तू प्रियच.
सर्वकाल प्रियच.
प्रियाणां प्रियदर्शी...

२.

"पाऊस म्हणून कुणीही
दारात उभं राहिलं तर
घरात घेशील..."
तूच म्हणत होतास
परवा परवा...

आत्मानुभवाचंच
गाणं हे?
तुला घेतलाच आहे ना
घरात?

३.

ह्या नाहीत प्रेमकविता.
हे साधं सांगणं !
हे आत्म्याचं बोलणं
जसं
पावसाचं असणं.

वनवास भोगतांना - वासंती मुझुमदार

वनवास भोगतांना
जळ उदंड भेटले
कशी न्हाऊ... किती न्हाऊ
पळ थिजून थांबले

वनवास भोगतांना
असे नाचले मयूर
तुम्ही भेटाल म्हणून
केला शकुन त्यावर

किती सांगू हो श्रीहरी
वाट किती मी पाहिली
दीठ धाडून तुम्हांसी
खाली देहुली ठेवली

(सहेला रे)

झोका - संजीवनी मराठे

रेशिमपाशामधुनि सुटावे
म्हणता अधिकच गुरफटते मी
बसल्याठायी रुजेन, म्हणता
दूरदूरवर भरकटते मी

आभाळाची होईन म्हणता
क्षणात झरझर येते खाली
कुशित भुईच्या मिटेन म्हणता
जीव कळीतून उमलू पाही

असले झोके घेता घेता
माझे मजला उरले नाही
परकेपणिही हे नित्याचे
अजून झुलणे सरले नाही