मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११

झोका - संजीवनी मराठे

रेशिमपाशामधुनि सुटावे
म्हणता अधिकच गुरफटते मी
बसल्याठायी रुजेन, म्हणता
दूरदूरवर भरकटते मी

आभाळाची होईन म्हणता
क्षणात झरझर येते खाली
कुशित भुईच्या मिटेन म्हणता
जीव कळीतून उमलू पाही

असले झोके घेता घेता
माझे मजला उरले नाही
परकेपणिही हे नित्याचे
अजून झुलणे सरले नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: