मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११

वासंती मुझुमदार

१.

रिमझिम
झडी
बौछार...
ही तुझीच अलोलिक रुपं
म्हणून मला सगळीच अति प्रिय.

कधी अनपेक्षितपणे रुप पालटून
आलास ना :
सनेही होऊन,
सोहन होऊन,
ललितसुंदर होऊन,
तर कधी भैरव होऊन, भीम होऊन,
कधी तर जोगिया होऊन,
अगदी फक्कड होऊनदेखील...

तरी तू प्रियच.
सर्वकाल प्रियच.
प्रियाणां प्रियदर्शी...

२.

"पाऊस म्हणून कुणीही
दारात उभं राहिलं तर
घरात घेशील..."
तूच म्हणत होतास
परवा परवा...

आत्मानुभवाचंच
गाणं हे?
तुला घेतलाच आहे ना
घरात?

३.

ह्या नाहीत प्रेमकविता.
हे साधं सांगणं !
हे आत्म्याचं बोलणं
जसं
पावसाचं असणं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: