उंची न अपुली वाढते फारशी वाटून हेवा!
श्रेय ज्याचें त्यास द्यावे; एवढें लक्षांत ठेवा.
ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी;
ती न कामी आपुल्या; एवढें लक्षांत ठेवा.
जाणतें जें सांगती तें ऐकुनी घ्यावें सदा;
मात्र तींही माणसें! एवढें लक्षांत ठेवा.
चिंता जगीं या सर्वथा कोणा न येई टाळतां;
उद्योग चिंता घालवी; एवढें लक्षांत ठेवा.
दुप्पटीनें देतसे जो ज्ञान आपण घेतलेलें,
तो गुरुचे पांग फेडी; एवढें लक्षांत ठेवा.
माणसाला शोभणारें युद्ध एकच या जगीं;
त्यानें स्वत:ला जिंकणे! एवढें लक्षांत ठेवा.