बुधवार, २४ जून, २०२६

पितात सारे गोड हिवाळा !– बा. सी. मर्ढेकर

पितात सारे गोड हिवाळा

न्हालेल्या जणू गर्भवतीच्या 
सोज्वळ मोहकतेनें बंदर
मुंबापुरीचें उजळित येई 
माघामधली प्रभात सुंदर.
सचेतनांचा हुरूप शीतल; 
अचेतनांचा वास कोवळा;
हवेत जाती मिसळुनि दोन्ही. 
पितात सारे गोड हिवाळा !

डोकीं अलगद घरें उचलती 
काळोखाच्या उशीवरूनी;
पिवळे हंडे भरून गवळी 
कावड नेती मान मोडुनी;
नितळ न्याहारिस हिरवी झाडें 
काळा वायू हळुच घेती;
संथ बिलंदर लाटांमधुनी 
सागर-पक्षी सूर्य वेचती;
गंजदार, पांढर्‍या नि काळ्या 
मिरवित रंगा अन नारिंगी, 
धक्क्यावरच्या अजून बोटी 
साखरझोपेमधीं फिरंगी;
कुठें धुराचा जळका परिमल, 
गरम चहाचा पत्ती गंध;
कुठें डांबरी रस्त्यावरच्या
भुर्‍या शांततेचा निशिगंध;
ह्या सृष्टीच्या निवांत पोटी 
परंतु लपली सैरावैरा,
अजस्त्र धांदल, क्षणांत देइल 
जिवंततेचें अर्ध्य भास्करा.

थांब! जरासा वेळ तोंवरी–– 
अचेतनांचा वास कोवळा;
सचेतनांचा हुरूप शीतल; 
उरे घोटभर गोड हिवाळा !

बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२५

शून्य मनाच्या घुमटांत - बालकवी

शून्य मनाच्या घुमटांत कसलें तरि घुमतें गीत; अर्थ कळेना कसलाही, विश्रांती परि त्या नाहीं; वारा वाही, निर्झर गाई, मर्मर होई. परि त्याचे भीषण भूत घोंघावत फिरतें येथ. दिव्यरूपिणी सृष्टी जरी भीषण रूपा एथ धरी; जग सगळे भीषण होतें नांदाया मग ये येथें; न कळे असला, घुमट बनविला, कुणीं कशाला?--

सोमवार, १ सप्टेंबर, २०२५

सर्सर सर्सर वाजे… - आरती प्रभू


सर्सर सर्सर वाजे…
पत्ताच पत्ताच नाही;
वाऱ्याशी निरोप आला:
आत्ताच आत्ताच नाही

टप्पोर टप्पोर कळ्या
विलग झाल्यात काही;
नुस्ताच हलून वारा
सुगंध हलत नाही

झंझन झंझन झाले,
पाखरू उडत गेले;
उलट उलट झाड
तळ्यांत बुडत गेले

झर्झर झर्झर गेली
घाईत घाईत कोण?
गवतपातींत सर
उन्हांत पाडीत सोनं 

थर्थर थर्थर शुभ्र
झाडून उदास पंख,
तळ्याशी अनाम पक्षी
झालेला निव्वळशंख

वेलीत फुल मिटताना - शांता शेळके


वेलीत फुल मिटताना, दूरच्या निळ्या रेषेशी, घन गर्द मेघ उठताना, मज चाहूल देते काही
पाऊस फिका पडताना, निःशब्द हिरवळीवरती, पाकळी मुकी झडताना, मज विकल करी ते काही पाण्यात किरण विरताना, काळाच्या छाया मधुनी, काळोख अधिक भरताना, मज घेरीत येते काही वाऱ्यास धुके शिवताना, भिजलेल्या गालावरती, पापणी श्रांत लवताना, मी विसरू बघते काही

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०२३

स्फुट ओव्या

 माय म्हनता म्हनता 

    होट होटालागे भिडे 

आत्या म्हनता म्हनता 

    केवढं अंतर पडे


माय म्हतली म्हतली 

    जशी तोंडातली साय 

बाय म्हतली बिराणी

    जशी भरडली दाय 


ताता म्हनता म्हनता 

    दातामधीं जीभ अडे 

काका म्हनता म्हनता 

    कशी मांघे मांघे दडे 


जीजी म्हनता म्हनता     

    झाला जीभले निवारा 

सासू म्हनता म्हनता 

     गेला तोंडातून वारा! 

बुधवार, ९ नोव्हेंबर, २०२२

सोहळा

 आतले न मना गवसे,
  मनातले न ये मुखी ;
मुखातून बोलतांना
  भाषा त्यालाही पारखी.

जाणिवेच्या व्यापाराला
  अशी उतरती कळा;
तरी करितों साजरा  
  मुक्या शब्दांचा सोहळा

निघे दिवाळे तरीही
  लागे करावी दिवाळी;
अगा शंकरही नाचे
  भस्म असून कपाळी 


- जातक

गुरुवार, ७ एप्रिल, २०२२

विरामचिन्हे - केशवकुमार

जेव्हा काव्य लिहावयास जगती प्रारंभ मी मांडिला, 

जे जे दृष्टित ये तयावर 'करू का काव्य?' वाटे मला, 

तारा, चंद्र, फुले, मुले किति तरी वस्तू लिहाया पुढे, 

तेव्हा 'स्वल्पविराम' मात्र दिसतो स्वच्छंद चोहीकडे ! 

झाले काव्य लिहून - यास कुठल्या धाडू परी मासिका? 

याते छापिल कोण? लावू वशिला कोठे? कसा नेमका? 

रद्दीमाजि पडेल का? परत वा साभार हे येईल? 

सारे लेखन तेधवा करितसे मी 'प्रश्नचिन्हा' कुल! 

अर्धांगी पुढती करून कविता नावे तिच्या धाडिली, 

अर्धे काम खलास होइल अशी साक्षी मनी वाटली ! 

कैसा हा फसणार डाव? कविता छापून तेव्हाच ये ! 

केला 'अर्धविराम' तेथ; गमले तेथून हालू नये ! 

झाली मासिकसृष्टि सर्व मजला कालांतरे मोकळी, 

केले मी मग काव्यगायन सुरू स्वच्छंद ज्या त्या स्थळी ! 

माझे 'गायन' ऐकताच पळती तात्काळ श्रोतेजन ! 

त्या काळी मग होतसे सहजची 'उद्गार' वाची मन ! 

डेंग्यू, प्लेग, मलेरिया, ज्वर तसे अन् इन्फ्लुएन्झा जरी 

ही एकेक समर्थ आज असती न्याया स्मशानांतरी - 

सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथे परी साधला, 

देवा, 'पूर्णविराम', त्या कविस या देशी न का आजला?