सोमवार, २१ सप्टेंबर, २०२६

देवा पुढचा दिवा- सदानंद रेगे

 देवा पुढचा दिवा असू द्या रे तसाच 


आपणच देवाला अंधारात ठेवलं

तर हरवून टाकील तो आकाश 

या खोलीच्या खबदाडात 

तेवढाच रात्रभर प्रकाश


किती तूप असं 

लागणार लागून लागून 

एक फुलवात घातली 

की सगळं ऊनच ऊन


 दिसू दे जरा देवाला 

 हा अनादी अंधार 

 लागला तर लागू दे 

 एकदा कोमल गंधार…!

श्रावण - प्रा. सदानंद रेगे

आला श्रावण श्रावण

गुच्छ रंगांचे घेऊन 

ऊन-पावसाचे पक्षी

आणि ओंजळीमधून


निळे स्वप्न कुजबुजे

हळू पाखरांच्या कानी 

ऊन कोवळे दाटले

केशराच्या रानोरानी 


आता मेल्या मरणाला

जिती पालवी फुटेल

गोठलेल्या श्वासांना

पंख नवीन येतील


आता धरतील फेर

कवडशांची डाळिंबे

वर्षतील नभातून

शाश्वताची निळी टिंबे 


आला श्रावण श्रावण

ओल्या सोनपावलांनी 

दाही दिशा महिरल्या

यौवनाच्या मंजिऱ्यांनी

बुधवार, २४ जून, २०२६

पितात सारे गोड हिवाळा !– बा. सी. मर्ढेकर

पितात सारे गोड हिवाळा

न्हालेल्या जणू गर्भवतीच्या 
सोज्वळ मोहकतेनें बंदर
मुंबापुरीचें उजळित येई 
माघामधली प्रभात सुंदर.
सचेतनांचा हुरूप शीतल; 
अचेतनांचा वास कोवळा;
हवेत जाती मिसळुनि दोन्ही. 
पितात सारे गोड हिवाळा !

डोकीं अलगद घरें उचलती 
काळोखाच्या उशीवरूनी;
पिवळे हंडे भरून गवळी 
कावड नेती मान मोडुनी;
नितळ न्याहारिस हिरवी झाडें 
काळा वायू हळुच घेती;
संथ बिलंदर लाटांमधुनी 
सागर-पक्षी सूर्य वेचती;
गंजदार, पांढर्‍या नि काळ्या 
मिरवित रंगा अन नारिंगी, 
धक्क्यावरच्या अजून बोटी 
साखरझोपेमधीं फिरंगी;
कुठें धुराचा जळका परिमल, 
गरम चहाचा पत्ती गंध;
कुठें डांबरी रस्त्यावरच्या
भुर्‍या शांततेचा निशिगंध;
ह्या सृष्टीच्या निवांत पोटी 
परंतु लपली सैरावैरा,
अजस्त्र धांदल, क्षणांत देइल 
जिवंततेचें अर्ध्य भास्करा.

थांब! जरासा वेळ तोंवरी–– 
अचेतनांचा वास कोवळा;
सचेतनांचा हुरूप शीतल; 
उरे घोटभर गोड हिवाळा !