बुधवार, २४ सप्टेंबर, २००८

गवतफुला - इंदिरा संत

गवतफुला

रंगरंगुल्या, सानसानुल्या,
गवतफुला रे गवतफुला;
असा कसा रे सांग लागला,
सांग तुझा रे तुझा लळा.

मित्रासंगे माळावरती,
पतंग उडवित फिरताना;
तुला पाहिले गवतावरती,
झुलता झुलता हसताना.

विसरुनी गेलो पतंग नभिचा;
विसरून गेलो मित्राला;
पाहुन तुजला हरवुन गेलो,
अशा तुझ्या रे रंगकळा.

हिरवी नाजुक रेशिम पाती,
दोन बाजुला सळसळती;
नीळ निळुली एक पाकळी,
पराग पिवळे झगमगती.

मलाही वाटे लहान होऊन,
तुझ्याहुनही लहान रे;
तुझ्या संगती सडा रहावे,
विसरून शाळा, घर सारे.

३ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

हि कविता अर्धवट आहे. माझ्या माहितीतील पूर्ण कविता मी खाली देत आहे.

रंगरंगुल्या, सानसानुल्या,
गवतफुला रे गवतफुला;
असा कसा रे मला लागला,
सांग तुझा रे तुझा लळा.

मित्रासंगे माळावरती,
पतंग उडवित फिरताना;
तुला पाहिले गवतावरती,
झुलता झुलता हसताना.

विसरुनी गेलो, पतंग नभीचा,
विसरून गेलो मित्राला;
पाहून तुजला हरखुन गेलो,
अशा तुझ्या रे रंगकळा.

हिरवी नाजुक, रेशिम पाती,
दोन बाजुला सळसळती;
नीळ निळुली एक पाकळी,
पराग पिवळे झगमगती.

तळी पुन्हा अन गोजिरवाणी,
लाल पाकळी खुलते रे;
उन्हामध्ये हे रंग पाहता,
भानच हरपुनी गेले रे

पहाटवेळी आभाळ येते,
लहान होउनी तुझ्याहुनी;
तुला भरविते निळ्या करांनी,
दवमोत्यांची कणी कणी.

वारा घेवूनी रूप सानुले,
खेळ खेळतो झोपाळा;
रात्रही इवली होऊन म्हणते
अंगाईचे गीत तुला.

गोजिरवाणा हो रवीचा कण
छाया होते इवलीशी;
तुझ्या संगती लपून खेळते,
रमून जाते पहा कशी.

तुझी गोजिरी, शिकून भाषा,
गोष्टी तुजला सांगाव्या;
तुझे शिकावे खेळ आणखी,
जादू तुजला शिकवाव्या.

आभाळाशी हट्ट करावा
खाऊ खावा तुझ्यासवे;
तुझे घालुनी रंगीत कपडे,
फुलपाखरां फसवावे.

मलाही वाटे लहान व्हावे
तुझ्याहूनही लहान रे;
तुझ्या संगती सदा रहावे,
विसरुनी शाळा घर सारे

Unknown म्हणाले...

कवीने गवतफुलसाठी काय विशेषणे वापरली आहे

Unknown म्हणाले...

रंगरंगुल्या सानसानुल्या ही विशेषणे कवीने गवतफुलासाठी वापरली आहे.