सोमवार, १४ नोव्हेंबर, २०११

स्पर्श - बा. भ. बोरकर

फुलल्या लाख कळ्या
स्पर्शसुगंधा घन अंधारी फुटल्या ग उकळ्या

ध्वनिकंपित तनुच्या शततंत्री
बंदी मन रतीमोहमंत्री
लय लागुनिया नाचु लागल्या स्वप्नीच्या पुतळ्या

धूप जळे तिमिराचा पवनी
विनिद्रनयना व्याकुळ अवनी
पिकुनी लावल्या नक्षत्रांच्या द्राक्ष लता पिवळ्या

भुई वाळुची संगमरवरी
तीवर काळ्या फेनिल लहरी
व्यथेतुनी सुख मंथित ग्रंथित झाल्या मधुर निळ्या

सुटल्या अवचित जटिल समस्या
फुटला रव स्मरकुटिल रहस्या
जननांतरिच्या स्मृतिच्या ज्योती पाजळल्या सगळ्या

द्रवली नयने, स्रवली हृदये
दो चंद्राच्या संगम-उदये
दुणी पौर्णिमा, रसा न सीमा, उसळ्यांवर उसळ्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: