बुधवार, २४ जानेवारी, २००७

मित्रा - सुधीर मोघे

मित्रा,
एका जागी नाही असे फार थांबायचे
नाही गुंतून जायचे, नाही गुंतून जायचे

दूरातल्या अदृष्टाशी तुझी झाली आणभाक
तुझ्या काळजात एक आर्त छळणारी हाक
रक्त इमानी तयाने असे नाही भुलायाचे
नाही गुंतून जायचे, नाही गुंतून जायचे

घट्ट रेशमाची मिठी तुला सोडावी लागेल
जन्मगाठ जिवघेणी तुला तोडावी लागेल
निरोपाचे खारे पाणी कुणा दिसू न द्यायचे
नाही गुंतून जायचे, नाही गुंतून जायचे

होय, कबूल; तुलाही हवा कधीचा निवारा
गर्द झाडाची सावली आणि चंदनाचा वारा
पण पोरक्या उन्हात, सांग कोणी पोळायचे?
नाही गुंतून जायचे, नाही गुंतून जायचे

मंगळवार, २३ जानेवारी, २००७

तेच ते नि तेच ते - विंदा करंदीकर

सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !! तेच ते !!
माकडछाप दंतमंजन,
तोच चहा तेच रंजन
तीच गाणी तेच तराणे,
तेच मूर्ख तेच शहाणे
सकाळपासुन रात्रीपर्यंत
तेच ते तेच ते

खानावळीही बदलून पाहिल्या
कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं.
काकू पासून ताजमहाल,
सगळीकडे सारखेच हाल
नरम मसाला, गरम मसाला,
तोच तो भाजीपाला
तीच ती खवट चटणी,
तेच ते आंबट सार
सुख थोडे दु:ख फार

संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे
त्या स्वप्नाचे शिल्पकार,
कवि थोडे कवडे फार
पडद्यावरच्या भूतचेष्टा;
शिळा शोक, बुळा बोध
नऊ धगे एक रंग,
व्यभिचाराचे सारे ढंग
पुन्हा पुन्हा तेच भोग
आसक्तीचा तोच रोग
तेच ' मंदिर ' तीच ' मूर्ती '
तीच ' फुले ' तीच ' स्फुर्ती '
तेच ओठ तेच डोळे
तेच मुरके तेच चाळे
तोच पलंग तीच नारी
सतार नव्हे एकतारी

करीन म्हटले आत्महत्त्या
रोमिओची आत्महत्त्या
दधीचिची आत्महत्त्या
आत्महत्त्याही तीच ती
आत्मा ही तोच तो
हत्त्याही तीच ती
कारण जीवनही तेच ते
आणि मरणही तेच ते

सोमवार, २२ जानेवारी, २००७

माझे जीवनगाणे - कुसुमाग्रज

माझे जगणे होते गाणे

सुरेल केंव्हा, केंव्हा बेसुर
तालावाचून वा तालावर
कधी तानांची उनाड दंगल
झाले सुर दिवाणे

कधी मनाचे कधी जनाचे
कधी धनास्तव कधी बनाचे
कधी घनाशय कधी निराशय
केवळ नादतराणे

आलापींची संथ सुरावळ
वा रागांचा संकर गोंधळ
कधी आर्तता काळजातली
केंव्हा फक्त बहाणे

राईमधले राजस कूजन
कधी स्मशानामधले क्रन्दन
अजाणतेचे अरण्य केंव्हा
केंव्हा शब्द शहाणे

जमले अथवा जमले नाही
खेद खंत ना उरली काही
अदॄश्यातिल आदेशांचे
ओझे फक्त वाहणे

सुत्रावाचून सरली मैफल
दिवेही विझले सभागॄहातिल
कशास होती आणि कुणास्तव
तो जगदीश्वर जाणे

गुरुवार, १८ जानेवारी, २००७

समुद्रराग - बा.भ.बोरकर

पावसात जागला समुद्रराग सावळा
लाट लाट दाटते भरुन भाव कोवळा

काठ काठ ढासळे, पिसाट माड स्फुंदती
आंधळ्या ढगांतूनी प्रकाशबिंदू सांडती

हाक ये दूरुन एक झाकळून टाकते
गाढ गूढ आठवांत मूक वेल वाकते

माखते चराचरी अथांग गांग गारवा
आगळा जगास ये उदास रंग पारवा

धूसरे सरींत दूर, सूरसूर व्याकळे
भाव की अभाव हा करी सुगंध मोकळे

कोण ही व्यथा अशी सुखास लाज आणते
सागरार्थ कोणत्या उसासुनी उधाणते

मंगळवार, १६ जानेवारी, २००७

हा दीप तमावर मात करी - मंगेश पाडगांवकर

अंधार दाटला घोर जरी
हा दीप तमावर मात करी

पुसुनि आसवे हसुनि जरा बघ
अनंत तार्याची वर झगमग
ये परत, परत ये तुझ्या घरी
अंधार दाटला घोर जरी
हा दीप तमावर मात करी

पिसाट वारे, वन वादळले
सूड घ्यावया जळ आदळले
ध्रुवतारा आहे अढळ तरी
अंधार दाटला घोर जरी
हा दीप तमावर मात करी

घावावचुन नसे देवपण
जळल्यावाचुन प्रकाश कोठुन?
कां सांग निराशा तुझ्या उरी?
अंधार दाटला घोर जरी
हा दीप तमावर मात करी

गुरुवार, ११ जानेवारी, २००७

अजूनही तिन्ही सांज - इंदिरा संत

चंदनाचा की चौरंग वर चांदीचे आसन
मायबाई अन्नपूर्णा रांगणारा बालकृष्ण
बाजूलाच सोनहंसी उभी चोचीत घेऊन
कांचनाची दीपकळी तिचे हळवे नर्तन
ओवाळाया आतुरसे पुढे तांब्याचे ताम्हन
हिलारती निरांजन उदवात धूपदान
तजेलशी गुलबास आणि नैवेद्याचा द्रोण

समोरच्या पाटावर लक्ष्मी घराची येणार
रोजचीच तिन्हीसांज मागे उभी राहणार

अजूनही तिन्हीसांज रोज येतच राहते
निरागस विध्वंसाच्या ढिगावरती टेकते
काळा धूर, लाल जाळ रास राखेची पाहते
काळोखाच्या ओढणीने डोळे टिपत राहते

बुधवार, १० जानेवारी, २००७

आजीचे घड्याळ - केशवकुमार

आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक,
देई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुणा ठाउक;
त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुके वाटते,
किल्ली देई न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते

"अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,"
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी
साडेपाचही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी
"बाळा झांजर जाहले, अरवला तो कोंबडा, उठ की !"

ताईची करण्यास जम्मत, तसे बाबूसवे भांडता
जाई संपुनियां सकाळ न मुळी पत्त कधी लागता !
"आली ओटिवरी उन्हे बघ!" म्हणे आजी, "दहा वाजले !
जा जा लौकर !" कानि तो घणघणा घंटाध्वनी आदळे.

खेळाच्या अगदी भरांत गढुनी जाता अम्ही अंगणी
हो केव्हा तिनिसांज ते न समजे ! आजी परी आंतुनी
बोले, "खेळ पुरे, घरांत परता ! झाली दिवेलागण,
ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन !"

आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भुतांच्या कथा
जाई झोप उडून, रात्र किती हो ध्यानी न ये ऐकता !
"अर्धी रात्र कि रे" म्हणे उलटली, "गोष्टी पुरे ! जा पडा !'
लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा

सांगे वेळ, तशाच वार-तिथीही आजी घड्याळातुनी
थंडी पाऊस ऊनही कळतसे सारें तिला त्यांतुनी
मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?
गाठोडे फडताळ शोधुनि तिचे आलो ! तरी ना मिळे !