गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०२३

स्फुट ओव्या

 माय म्हनता म्हनता 

    होट होटालागे भिडे 

आत्या म्हनता म्हनता 

    केवढं अंतर पडे


माय म्हतली म्हतली 

    जशी तोंडातली साय 

बाय म्हतली बिराणी

    जशी भरडली दाय 


ताता म्हनता म्हनता 

    दातामधीं जीभ अडे 

काका म्हनता म्हनता 

    कशी मांघे मांघे दडे 


जीजी म्हनता म्हनता     

    झाला जीभले निवारा 

सासू म्हनता म्हनता 

     गेला तोंडातून वारा! 

बुधवार, ९ नोव्हेंबर, २०२२

सोहळा

 आतले न मना गवसे,
  मनातले न ये मुखी ;
मुखातून बोलतांना
  भाषा त्यालाही पारखी.

जाणिवेच्या व्यापाराला
  अशी उतरती कळा;
तरी करितों साजरा  
  मुक्या शब्दांचा सोहळा

निघे दिवाळे तरीही
  लागे करावी दिवाळी;
अगा शंकरही नाचे
  भस्म असून कपाळी 


- जातक

गुरुवार, ७ एप्रिल, २०२२

विरामचिन्हे - केशवकुमार

जेव्हा काव्य लिहावयास जगती प्रारंभ मी मांडिला, 

जे जे दृष्टित ये तयावर 'करू का काव्य?' वाटे मला, 

तारा, चंद्र, फुले, मुले किति तरी वस्तू लिहाया पुढे, 

तेव्हा 'स्वल्पविराम' मात्र दिसतो स्वच्छंद चोहीकडे ! 

झाले काव्य लिहून - यास कुठल्या धाडू परी मासिका? 

याते छापिल कोण? लावू वशिला कोठे? कसा नेमका? 

रद्दीमाजि पडेल का? परत वा साभार हे येईल? 

सारे लेखन तेधवा करितसे मी 'प्रश्नचिन्हा' कुल! 

अर्धांगी पुढती करून कविता नावे तिच्या धाडिली, 

अर्धे काम खलास होइल अशी साक्षी मनी वाटली ! 

कैसा हा फसणार डाव? कविता छापून तेव्हाच ये ! 

केला 'अर्धविराम' तेथ; गमले तेथून हालू नये ! 

झाली मासिकसृष्टि सर्व मजला कालांतरे मोकळी, 

केले मी मग काव्यगायन सुरू स्वच्छंद ज्या त्या स्थळी ! 

माझे 'गायन' ऐकताच पळती तात्काळ श्रोतेजन ! 

त्या काळी मग होतसे सहजची 'उद्गार' वाची मन ! 

डेंग्यू, प्लेग, मलेरिया, ज्वर तसे अन् इन्फ्लुएन्झा जरी 

ही एकेक समर्थ आज असती न्याया स्मशानांतरी - 

सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथे परी साधला, 

देवा, 'पूर्णविराम', त्या कविस या देशी न का आजला?

अनंत - कुसुमाग्रज

 

एकदा ऐकले
    काहींसें असें
असीम अनंत
    विश्वाचे रण
त्यात हा पृथ्वीचा
    इवला कण
त्यांतला आशिया
    भारत त्यांत
छोट्याशा शहरीं
    छोट्या घरांत
घेऊन आडोसा
    कोणी 'मी' वसें
क्षुद्रता अहो ही
    अफाट असें!
भिंतीच्या त्रिकोनी
    जळ्मट जाळी
बांधून राहती
    कीटक कोळी
तैशीच सारी ही
    संसाररीती
आणिक तरीही
    अहंता किती?
परंतु वाटलें
    खरें का सारें?
क्षुद्र या देहांत
    जाणीव आहे
जिच्यात जगाची
    राणीव राहे!
कांचेच्या गोलांत
    बारीक तात
ओतीत रात्रीत
    प्रकाशधारा
तशीच माझ्या या
    दिव्याची वात
पाहते दूरच्या
    अपारतेंत!
अथवा नुरलें
    वेगळेंपण
अनंत काही जें
    त्याचाच कण!
डोंगरदऱ्यांत
    वाऱ्याची गाणीं
आकाशगंगेत
    ताऱ्यांचे पाणीं
वसंतवैभव
    उदार वर्षा
लतांचा फुलोरा
    केशरी उषा....
प्रेरणा यांतून
    सृष्टीत स्फुरे
जीवन तेज जें
    अंतरी झरे
त्यानेच माझिया
    करी हो दान
गणावे कसे हें
    क्षुद्र वा सान?

बुधवार, १२ जानेवारी, २०२२

बरसात - शांता शेळके

संबंधांचे अर्थ कधीच लावू नयेत
त्यांचा फक्त नम्र कृतज्ञतेने स्वीकार करावा
जसा पाण्याचा झुळझुळ नितळ जिव्हाळा
जुळलेल्या समंजस ओंजळीत धरावा...

 संबंधांचे धागे कधीच उलगडू नयेत
ते फक्त प्राणांभोवती सहज घ्यावेत लपेटून,
जसे हिवाळ्यातल्या झोंबऱ्या पहाटगारठ्यात
अंगांगी भिनवीत राहावे कोवळे धारोष्ण ऊन्ह...

संबंध तुटतानाही एक अर्थ आपल्यापुरता....
एक धागा... जपून ठेवावा खोल हृदयात
एखादे रखरखीत तप्त वाळवंट तुडवताना
माथ्यावर आपल्यापुरती खासगी बरसात...

गुरुवार, ३ जून, २०२१

साठीचा गजल - विंदा करंदीकर

सारे तिचेच होते, सारे तिच्याचसाठी;
हे चंद्र, सूर्य, तारे होते तिच्याच पाठी.

आम्हीहि त्यात होतो, खोटे कशास बोला,
त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी !

उगवावयाची उषा ती अमुची तिच्याच नेत्री
अन् मावळावयाची संध्या तिच्याच ओठी

दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून,
नेसायचे मुमुक्षू इस्त्री करून छाटी !

जेव्हा प्रदक्षिणा ती घालीच मारुतीला
तेव्हा पहायची हो मूर्ती वळून पाठी !

प्रत्यक्ष भेटली कां ? नव्हती तशी जरूरी;
स्वप्नात होत होत्या तसल्या अनेक भेटी.

हसतोस काय बाबा, तू बाविशीत बुढ्ढा,
त्यांना विचार ज्यांची उद्या असेल साठी

शुक्रवार, २६ मार्च, २०२१

संध्याकाळच्या कविता

क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी… देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी… गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे… बुडता बुडता सांजप्रवाही अलगद भरूनी यावे…