बुधवार, ११ एप्रिल, २००७

जिना - वसंत बापट

कळले आता घराघरातुन;
नागमोडीचा जिना कशाला,
एक लाडके नाव ठेऊनी;
हळूच जवळी ओढायाला.

जिना असावा अरूंद थोडा;
चढण असावी अंमळ अवघड,
कळूनही नच जिथे कळावी;
अंधारातील अधीर धडधड.

मूक असाव्या सर्व पाय-या;
कठडाही सोशिक असावा,
अंगलगीच्या आधारास्तव;
चुकून कोठे पाय फसावा.

वळणावरती बळजोरीची;
वसुली अपुली द्यावी घ्यावी,
मात्र छतातच सोय पाहूनी;
चुकचुकणारी पाल असावी.

जिना असावा असाच अंधा;
कधी न कळावी त्याला चोरी,
जिना असावा मित्र इमानी;
कधी न करावी चहाडखोरी.

मी तर म्हणतो - स्वर्गाच्याही;
सोपानाला वळण असावे,
पॄथ्वीवरल्या आठवणींनी
वळणावळणावरी हसावे...

४ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

shewatche Kadwe atishay sundar aahe!

Unknown म्हणाले...

प्रचंड सुंदर आहे। अश्या अजुन कविता पोस्ट करा ज्याने करुण नव्या पीढिला यांच्यात आवड़ निर्माण व्हावी

Unknown म्हणाले...

खूप मस्त, अरुंद आणि अंधार्या जिण्याला इतकं रोमँटिक वळण...
मस्तच

Unknown म्हणाले...

Kay apratim Kavita ahe